पोलिस स्टेशनच्या ‘नाकाखाली’ सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; एलसीबीची मध्यरात्री धडक कारवाई
। जळगाव । जगदीश सपकाळे ।
जळगाव शहरातील टॉवर चौक परिसरातील एका नामांकित लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शनिवारी मध्यरात्री धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या या रॅकेटमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अत्यंत गोपनीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेत काही महिलांची सुटका केली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित लॉजमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या देहविक्री करवून घेतली जात असल्याची माहिती राहुल गायकवाड यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांनी संयुक्त कारवाईची योजना आखली.
बनावट ग्राहक पाठवून सापळा
या कारवाईदरम्यान पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून लॉजमधील व्यक्तीशी पैशांची बोलणी केली. व्यवहार निश्चित होताच संबंधित ग्राहकाने पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पथकाने लॉजवर छापा टाकत सुरू असलेला कथित वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी राजू मोतीराम जोशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल
आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (पीटा) अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटचे धागेदोरे इतर भागांपर्यंत पोहोचले आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात सापडलेल्या महिलांची सुटका करून त्यांचे समुपदेशन सुरू करण्यात आले असून त्यांना सुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच एलसीबी आणि एएचटीयू पथकाने केली.
