श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात जोरदार आंदोलन; ग्राहकांच्या समस्यांबाबत निवेदन
टिटवाळा (संदीप शेंडगे) : कल्याण-डोंबिवली परिसरातील घरगुती गॅस ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत टिटवाळ्यातील श्रद्धा गॅस एजन्सीविरोधात जोरदार आंदोलन केले. गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करावा आणि ग्राहकांची होणारी गैरसोय थांबवावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
घरगुती गॅस सिलेंडर वितरणात होत असलेला मोठ्या प्रमाणावरील विलंब, घरपोच सेवा नाकारणे, अतिरिक्त शुल्क आकारूनही ग्राहकांना स्वतः गोदामातून सिलेंडर आणण्यास भाग पाडणे, अधिकृत पावती न देणे तसेच ग्राहकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
मनसेच्या निवेदनानुसार, शासन आणि तेल कंपन्यांकडून गॅसचा कोणताही तुटवडा नसल्याचे वारंवार सांगितले जात असतानाही प्रत्यक्षात ग्राहकांना सिलेंडर मिळण्यासाठी तब्बल २० ते २२ दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. एवढेच नव्हे तर, सिलेंडर वितरणानंतर पुन्हा ३० दिवस पूर्ण झाल्याशिवाय पुढील बुकिंग करता येणार नसल्याचे ग्राहकांना सांगितले जात असल्याने वर्षभरात मिळणारे हक्काचे १२ सिलेंडर मिळणेही अनेक कुटुंबांसाठी कठीण बनले आहे.
या प्रकारामुळे गृहिणींसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरपोच वितरणासाठी ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असतानाही अनेकांना प्रत्यक्षात घरपोच सेवा मिळत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे. परिणामी, अनेक ग्राहकांना थेट गोदामात जाऊन सिलेंडर आणावे लागत असून, त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या आंदोलनावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास दादा भोईर, उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोय यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभाग अध्यक्ष धनंजय पाटील, विधी व न्याय विभागाचे जयेश खंदारे, ॲड. अविनाश शिळकांदे, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचे ॲड. अविनाश शेळकांदे, दिलीप राठोड, विशेष कार्यकारी अधिकारी मिलिंद ठाकरे, गिरीश यशवंतराव, समीर मेस्त्री तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला असून, ग्राहकांच्या समस्या तातडीने न सोडवल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
