स्वतंत्र सबस्टेशन असूनही नागरिक अंधारात, आंदोलनाचा इशारा
पारोळा (राहुल जयकर) : पारोळा तालुक्यातील शेळावे खुर्द गावात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या वारंवार वीज खंडित प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गावात स्वतंत्र वीज सबस्टेशन उपलब्ध असतानाही रात्रीच्या वेळी अर्धा ते एक तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
सततच्या वीज समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः उष्णतेच्या तीव्र लाटेमध्ये रात्रीच्या वेळी वीज गुल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पारधी क्रांती संघटना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष आणि भीम आर्मी पारोळा तालुका उपाध्यक्ष प्रविण पारधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदविला.
“गावात स्वतंत्र सबस्टेशन असूनही नागरिकांना अंधारात राहावे लागत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. आम्ही नियमितपणे वीज बिल भरतो, मग आम्हाला मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” असा सवाल प्रविण पारधी यांनी उपस्थित केला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, समस्या तात्काळ मार्गी न लावल्यास लोकहितासाठी तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडण्यात येईल, असा इशाराही प्रविण पारधी यांनी दिला आहे.
