‘वीणा’ फिल्टर प्लांटवर परवानगीशिवाय पाणीपुरवठ्याचा आरोप; प्रशासनाच्या कारवाईची मागणी
प्रदूषण नियंत्रण मंडळाची NOC नसल्याचा आरोप | BIS मानांकनाशिवाय पाणी विक्री सुरू? | दूषित पाण्यामुळे नागरिकांमध्ये संताप
धरणगाव : धरणगाव शहरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या कथित “वीणा” फिल्टर प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची आवश्यक परवानगी (NOC) तसेच BIS मानांकन नसतानाही हा प्लांट गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्लांटमधून पुरवले जाणारे पाणी पूर्णपणे शुद्ध न करता थेट नागरिकांना विकले जात असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे अनेक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार समोर आली आहे.
दूषित पाण्यामुळे आजारांचा धोका
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्लांटमधून पुरवठा होणाऱ्या पाण्यात घाण, दुर्गंधी आणि अशुद्धी आढळून येत आहे. हे पाणी वापरल्यानंतर काही नागरिकांना पोटदुखी, उलटी, जुलाब आणि इतर पोटाच्या विकारांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “१५ ते २० मिनिटांत गावात पाणी पोहोचवले जाते, असे सांगून विक्री केली जाते. मात्र त्या पाण्याची गुणवत्ता तपासलेली नसल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
स्थानिक प्रशासनाकडे तक्रार
या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
अवैध प्लांट बंद करण्याची मागणी
नागरिकांनी संबंधित फिल्टर प्लांटची तातडीने तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करावी, तसेच बेकायदेशीररित्या सुरू असलेला प्लांट त्वरित बंद करावा, अशी मागणी केली आहे. यासोबतच शहरात सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
धरणगावकर आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असून, या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करून नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न गांभीर्याने हाताळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
