शेवाळीतील शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; आंदोलनानंतर अधिकाऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन
धुळे (सुनील निकम) : भर उन्हाळ्यात तब्बल सात दिवसांपासून विजेचा ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने संतप्त झालेल्या शेवाळी येथील शेतकऱ्यांनी थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयालाच टाळे ठोकत तीव्र आंदोलन छेडले. वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर आंदोलनाच्या दबावामुळे वीज कंपनीचे अधिकारी नरमले असून तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सध्या धुळे जिल्ह्यासह परिसरात उन्हाचा कडाका वाढला असून, शेतकऱ्यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीची तयारी सुरू केली आहे. कापूस आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी पाण्याची गरज असताना सात दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने शेतीपंप ठप्प झाले होते. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा संपर्क करून तक्रारी करण्यात आल्या. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने अखेर शेतकऱ्यांचा संयम सुटला. संतप्त शेतकऱ्यांनी थेट वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठून कार्यालयाला टाळे ठोकले आणि अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेतकऱ्यांसोबत चर्चा करत तातडीने ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित केले असले, तरी लवकरात लवकर वीजपुरवठा सुरू न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी दीपक साळुंखे, डॉ. विजय साळुंखे, संजय साळुंखे, संदीप साळुंखे, अनिल साळुंखे, प्रशांत भामरे, सतीश साळुंखे, भगवान मारणर, सुरेश मारणर आणि सखाराम मारणर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, पावसाळा तोंडावर असताना ग्रामीण भागातील वीज समस्यांमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र पुन्हा समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
