‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या १०० प्रतींचे मोफत वितरण; संविधानिक मूल्ये आणि शिवविचारांचा जागर
धरणगाव (श्री वाल्मिक पाटील) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५१ व्या वर्धापनदिनानिमित्त धरणगाव शहरात संविधान जागर अभियान आणि सत्यशोधक समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विचारप्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या चर्चित पुस्तकाच्या १०० प्रतींचे नागरिकांना मोफत वितरण करून शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा जागर करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांच्या प्रास्ताविकाने झाली. उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवरायांच्या लोकाभिमुख राज्यकारभार, सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षतेच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.
संविधान जागर अभियानाचे कार्यकर्ते सुनील सोनार यांच्या पुढाकारातून ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकासह विविध महापुरुषांच्या जीवनकार्यावरील माहितीपर पत्रकांचेही वितरण करण्यात आले. युवक-युवतींसह नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी बोलताना सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून आजच्या समाजासाठीही ते तितकेच प्रेरणादायी आहे. शिवरायांचा खरा इतिहास आणि सामाजिक न्यायाची भूमिका समजून घेण्यासाठी प्रत्येकाने अशा साहित्याचे वाचन करणे आवश्यक असून कुटुंब आणि समाजात सामुदायिक वाचनाची चळवळ उभी राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
सुनील सोनार यांनी आपल्या मनोगतात शिवराज्याभिषेक दिन हा केवळ उत्सव नसून स्वराज्य, समता, न्याय आणि लोकहितकारी शासनव्यवस्थेच्या मूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. युवकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे, इतिहासाकडे चिकित्सक दृष्टीकोनातून पाहण्याची प्रेरणा देणे आणि संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला माळी समाजाचे अध्यक्ष व्ही. टी. माळी, काँग्रेस नेते महेश पवार, माजी नगरसेवक किरण मराठे, सलीम बेलदार, राजेंद्र बिऱ्हाडे, नंदू धनगर, लक्ष्मणराव पाटील, आरटीआयचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष आबासाहेब राजेंद्र वाघ, प्रा. आकाश बिवाल, सुरज वाघरे, हेमंत माळी, महेंद्र तायडे, संतोष सोनवणे, मयुर भामरे, सागर महाले, नामदेव मराठे, समाधान महाजन, रवी महाजन, गजानन मराठे, वाल्मिक पाटील, भैय्या धनगर यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
