महिलांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : समाजपरिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दूरदर्शी नेते, परिवर्तनकर्ते आणि लोकसेवकांचा गौरव करणाऱ्या लायन्स क्लब्स इंटरनॅशनल आणि लायन्स कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन १ जून २०२६ रोजी चेन्नई येथील आयटीसी ग्रँड चोला येथे उत्साहात पार पडले.
या भव्य सोहळ्यात सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. भानुबेन महेंद्र नानावटी होम सायन्स (सक्षम स्वायत्त) महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. माला पांडुरंग यांना महिलांच्या सक्षमीकरणासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रो. डॉ. माला पांडुरंग यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली डॉ. बीएमएन होम सायन्स (सक्षम स्वायत्त) महाविद्यालयाने महिला शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, कौशल्यविकास आणि विद्यार्थिनींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे महाविद्यालय मुंबईतील महिलांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे.
महिलांना सक्षम, स्वावलंबी आणि समाजाभिमुख नागरिक म्हणून घडविण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेला आणि सामाजिक बांधिलकीला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून विद्यार्थिनी, प्राध्यापकवर्ग आणि संस्थेच्या सर्व घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रो. डॉ. माला पांडुरंग यांच्या या यशाबद्दल विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महिला शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या क्षेत्रात आणखी नवे आदर्श निर्माण होतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
