छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक व पुष्पहार अर्पण; विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन
धुळे (सुनील निकम) : सकल मराठा समाज, धुळे यांच्या वतीने शनिवारी (दि. ६ जून) छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त धुळे शहरातील मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करण्यात आला तसेच पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय जिजाऊ, जय शिवराय” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करून त्यांच्या आदर्शांचे स्मरण केले.
यावेळी बोलताना सुधाकर दादा बेंद्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आजच्या काळात महत्त्व अधोरेखित केले. “समाजाने संघटित राहून एकजुटीने कार्य करणे ही काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम केले. त्यांच्या आदर्शांचा वारसा पुढे नेत गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास सकल मराठा समाजाचे भानुदास बगदे, विनोद जगताप, राजेंद्र काळे, निंबा मराठे, संजय शेंडे, उल्हास यादव, मनोज ढवळे, विकास बाबर, अतुल सोनवणे, किशोर वाघ, श्रीराम जाधव, सुनिल वरपे, सुनील पाटील, भैया शिंदे, पप्पू माने, दिपक रौधळ, अशोक बाबर, सुनिल ठाणगे, श्याम निरगुडे, उल्हास पाटील, राकेश भोसले, बापू कदम, संभा पाटील, विकी पाटील, गजानन हरणे यांच्यासह सकल मराठा समाजाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रनिर्मितीच्या विचारांचा आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रसार करण्याबरोबरच समाजात ऐक्य व बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.
