आर्मी स्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या चेतन महाजन यांचा अपघात; पत्नी, आई व तीन वर्षांचा चिमुकला मुलगा पोरका
रोटवद | प्रतिनिधी – प्रशांत शिंदे
रोटवद गावातील ३२ वर्षीय तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चेतन शांताराम महाजन (वय ३२) हे अमळनेर येथील आर्मी स्कूलमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. सोमवारी (दि. ८ जून २०२६) सायंकाळी सुमारे सहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान घरी परतत असताना पातोंडा-नांद्री परिसरात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन महाजन हे नेहमीप्रमाणे काम आटोपून आपल्या दुचाकीवरून (क्र. MH-19-DT-5240) रोटवदकडे परतत होते. दरम्यान, पातोंडा आणि नांद्री गावाजवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर चेतन महाजन यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात (बरसात) पडलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच रोटवद येथील शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.
चेतन महाजन यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांचा गोंडस मुलगा असा परिवार असून कुटुंबाचा आधारवड हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली जात असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातामुळे रोटवद आणि परिसरात शोककळा पसरली असून, भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची तसेच या मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
