मंगरूळजवळ कार, मोटरसायकल आणि एसटी बसची जोरदार धडक; साखरपुड्याला निघालेल्या गुजरातमधील कुटुंबावर काळाचा घाला
टिकर : मंगरूळ गावाजवळील हॉटेल वृंदावनसमोर सकाळी सातच्या सुमारास भीषण अपघात; कारमधील पाच जणांसह मोटरसायकलस्वाराचा मृत्यू, लहान मुलाची सुखरूप सुटका.
पारोळा | प्रतिनिधी (सुरेश पाटोळे)
अमळनेर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर मंगरूळ गावाजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. कार, मोटरसायकल आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये झालेल्या या भीषण धडकेत एक जण गंभीर जखमी झाला असून, अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल (क्र. एमएच १८ सी ८७१९) आणि एसटी बस (क्र. एमएच १३ सीयू ७५४०) अमळनेरहून धुळ्याकडे जात होत्या. त्याचवेळी धुळ्याकडून अमळनेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. जीजे १९ एएफ ३१४७) नियंत्रण गमावल्याने मोटरसायकल आणि एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.
या भीषण अपघातात धरणगाव येथील मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील पाच प्रवाशांनीही घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला. मृतांमध्ये गुजरात राज्यातील व्यारा येथील आदित्य चंद्रकांत महाजन, अनिता सुरेश महाजन, निर्मला नंदलाल महाजन, नंदलाल गोपाल महाजन आणि सुरेश विक्रम महाजन यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण अमळनेर येथे एका साखरपुडा समारंभासाठी येत होते.
११२ आपत्कालीन सेवेची तातडीची मदत
अपघाताची माहिती मिळताच ११२ आपत्कालीन सेवेच्या माध्यमातून पोलीस आणि मदत पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच पोलीस पाटील भागवत पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जखमींना १०८ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
कारमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
अपघातानंतर कारमध्ये एक लहान मुलगा अडकून पडल्याचे निदर्शनास आले. गावकरी, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत संयुक्तपणे प्रयत्न करून त्या मुलाची सुखरूप सुटका केली. या दुर्घटनेत एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत
अपघातामुळे अमळनेर–धुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला हटविली आणि वाहतूक सुरळीत केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून या भीषण अपघाताचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे अमळनेर, धरणगाव तसेच गुजरातमधील व्यारा परिसरात शोककळा पसरली असून, एका कुटुंबावर काळाने घातलेल्या या घाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
