महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार; प्रलंबित पीकविमा रक्कम तातडीने देण्याची मागणी
शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह तहसील कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचा जोरदार आवाज बुलंद केला. विशेषतः खरीप २०२५ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची प्रलंबित पीकविमा रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी, तसेच शिंदखेडा तालुक्यातील पीक नोंदणी, पंचनामे आणि संरक्षण प्रक्रियेची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.
शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करत पीकविमा वितरणातील विलंबामुळे आर्थिक संकट अधिक गडद होत असल्याचे सांगितले. वेळेत नुकसानभरपाई न मिळाल्याने शेतीचा खर्च भागविणे कठीण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मोर्चादरम्यान तहसीलदारांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरत प्रलंबित प्रकरणांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश दिले. पुढील काही दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती समोर आली.
प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी शेतकरी नेत्यांनी दिला.
