सेवा प्रवेश नियमांत दुरुस्ती, कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना अधिक अधिकार, स्वतंत्र परिषदेच्या मागणीवर सकारात्मक चर्चा
पदविकाधारक पशुवैद्यकांच्या मागण्यांना दिलासा • सेवा प्रवेश नियमांत दुरुस्तीची प्रक्रिया सुरू • कृत्रिम रेतन तंत्रज्ञांच्या अधिकारवाढीचे संकेत • स्वतंत्र परिषदेबाबत सकारात्मक चर्चा • प्रलंबित मागण्यांसाठी संघर्ष सुरूच
नशिराबाद । धीरज सैतवाल | प्रतिनिधी :
पदविकाधारक पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत पुणे येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत अनेक मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले. पशुवैद्यकीय, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सेवा नियम, कृत्रिम रेतन तंत्रज्ञान, स्वतंत्र परिषद, प्रशिक्षण आणि अभ्यासक्रम आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत पशुधन पर्यवेक्षक भरतीसाठीच्या सेवा प्रवेश नियमावलीतील त्रुटी दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. २००७ पूर्वी पदविका प्राप्त केलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत पात्र ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना ‘गर्भधारणा तपासणी’ करण्याचा अधिकार देण्याच्या मागणीबाबतही आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली. यासाठी आवश्यक पात्रतेमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, संबंधित प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.
बैठकीत महाराष्ट्र राज्य दुय्यम पशुवैद्यक परिषद स्थापन करण्याच्या मागणीवरही सविस्तर चर्चा झाली. यावेळी संघटनेने ‘पॅरा व्हेट’ या संज्ञेला तीव्र विरोध नोंदवत पदविकाधारक पशुवैद्यकांना स्वतंत्र व्यावसायिक ओळख देण्याची मागणी केली.
तसेच केंद्र शासनाच्या ‘पशुसखी’ आणि ‘पशुमित्र’ संकल्पनांबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली. या आक्षेपांची दखल घेत केंद्र सरकारकडे अधिकृत पत्र पाठविण्याचे आयुक्तांनी मान्य केले.
नवीन डिप्लोमा अभ्यासक्रम, प्रशिक्षण व्यवस्था आणि विविध अनुदान योजनांमधील अटी शिथिल करण्याबाबत स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
संघटनेने बैठकीत मांडलेल्या उर्वरित प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. राज्यातील सर्व आमदारांना पुन्हा निवेदन देऊन या मागण्यांसाठी व्यापक जनसमर्थन उभे करण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
या बैठकीस संघटनेचे अध्यक्ष डॉ. सु. वा. कुलकर्णी, कार्याध्यक्ष डॉ. सागर आरुटे, उपाध्यक्ष डॉ. अप्पासो पाटील, उपकार्याध्यक्ष डॉ. मल्हारी लवांडे, सचिव डॉ. वैभव पाटील, कोशाध्यक्ष डॉ. संदिप मंडलिक, सहसचिव डॉ. मुकेश चावरे तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. दिपक आहेर-पाटील आणि डॉ. संतोष तेरसे उपस्थित होते.
संघटनेने या बैठकीतील सकारात्मक निर्णयांचे स्वागत करत उर्वरित मागण्यांवरही लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
