धुळेचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांच्याकडून अभिनंदन; मुस्लिम समाजाच्या शिक्षण, रोजगार व विकासासाठी प्रभावी कार्याची अपेक्षा
ईद्रीस मुलतानी यांची राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती • राज्यमंत्री दर्जा बहाल • मुंबई मंत्रालयात नाजीम शेख यांच्याकडून सत्कार • मुस्लिम समाजाच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त
धुळे | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करून विकासात्मक उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ईद्रीस मुलतानी यांची नियुक्ती केली आहे. २९ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार त्यांना राज्यमंत्री दर्जाही बहाल करण्यात आला आहे. या नियुक्तीचे राज्यभरातून, विशेषतः खान्देशातून स्वागत करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अल्पसंख्याक विभागाचे धुळे जिल्हाध्यक्ष नाजीम शेख यांनी मुंबई मंत्रालयात ईद्रीस मुलतानी यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
नाजीम शेख यांनी या नियुक्तीचे स्वागत करताना सांगितले की, ईद्रीस मुलतानी यांच्या नेतृत्वामुळे मुस्लिम समाजाच्या शिक्षण, रोजगार, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक विकासाशी संबंधित प्रश्नांना शासन स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडता येईल.
त्यांच्या मते, या समितीच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना सक्षम प्रतिनिधित्व मिळेल, शैक्षणिक गळती रोखण्यासाठी उपाययोजना सुचविल्या जातील, स्वयंरोजगार व कर्जसुविधा वाढविण्यावर भर दिला जाईल, तसेच मुस्लिमबहुल भागांतील पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती मिळेल. याशिवाय विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी समिती अभ्यास करून आवश्यक शिफारसी करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नाजीम शेख म्हणाले, “ईद्रीस मुलतानी यांनी सातत्याने अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांसाठी कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शासनाने त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुस्लिम समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळण्यास निश्चितच मदत होईल.”
