स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, जनजागृती आणि सोनोग्राफी केंद्रांच्या देखरेखीत बजावणार महत्त्वाची भूमिका
मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांची नियुक्ती • पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय सल्लागार समितीवर संधी • स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंधासाठी जनजागृतीवर भर • जिल्हा शल्यचिकित्सकांचा आदेश
जळगाव | प्रतिनिधी :
गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) अर्थात पीसीपीएनडीटी जिल्हास्तरीय सल्लागार समितीवर सामाजिक कार्यकर्ते तथा मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी यासंदर्भातील नियुक्ती आदेश जारी केला.
या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती, मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी सामाजिक प्रबोधन तसेच आवश्यकतेनुसार सोनोग्राफी केंद्रांच्या तपासणीस सहकार्य करण्याची जबाबदारी समितीच्या सदस्यांवर राहणार आहे.
तसेच समितीच्या नियमित बैठकींना उपस्थित राहून कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्याची भूमिकाही सदस्यांकडून पार पाडली जाणार आहे.
मुकुंद गोसावी यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांनी स्वागत करत, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध आणि ‘बेटी बचाओ’ जनजागृती मोहिमेला त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
