आंबेडकर पुतळा चौकात घोषणाबाजी; नाटकाचा प्रयोग बंद पाडण्याचा इशारा, प्रशासनाकडे निषेध नोंदवला
‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ नाटकावरून वाद • भारतीय संविधान सेनेचे आंदोलन • बॅनर फाडत निषेध • नाटक बंद पाडण्याचा इशारा • धुळ्यात घोषणाबाजी
धुळे | प्रतिनिधी :
धुळे शहरात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार’ या नाटकाला भारतीय संविधान सेनेने तीव्र विरोध दर्शविला. आंबेडकर पुतळा चौक परिसरात लावण्यात आलेले नाटकाचे बॅनर फाडून आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासन प्रशासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) विरोधात घोषणाबाजी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै रोजी धुळ्यात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला असून त्यासाठी शहरातील विविध ठिकाणी प्रचाराचे बॅनर लावण्यात आले होते. भारतीय संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकास विरोध नोंदवत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील बॅनर फाडले.

आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरएसएसच्या भूमिकेवर टीका करत, महाराष्ट्राच्या इतिहासात डॉ. हेडगेवार यांच्या योगदानाबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच नाटकाचा प्रयोग होऊ देणार नसल्याचा इशारा देत प्रशासनाने कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी केली.
या आंदोलनात आनंद लोंढे, आबा अमृतसागर, रवींद्र पवार, चेतन गायकवाड, विजय भामरे, गोपाल शिरसाट, भाऊसाहेब बैसाने, गौतम पाटोळे यांच्यासह भारतीय संविधान सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, या आंदोलनानंतर प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाणार, तसेच नियोजित नाटकाचा प्रयोग पूर्वनियोजित वेळेनुसार होणार की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
