‘विद्यार्थ्यांना शिकवू द्या’च्या घोषणांनी धुळे दणाणले; शाळा बंद आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग
धुळे | सुनील निकम । विशेष प्रतिनिधी
टीईटी परीक्षा रद्द करणे, बीएलओसह इतर बिगर शैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करणे आणि शिक्षकांना केवळ अध्यापनासाठी उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी धुळ्यात आज प्राथमिक शिक्षकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हजारो शिक्षक रस्त्यावर उतरले असून, घोषणाबाजी करत त्यांनी शासनाचे लक्ष वेधून घेतले.
धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात विविध शिक्षक संघटनांनी सक्रिय सहभाग घेतला. कल्याण भवन येथून सुरू झालेला मोर्चा क्यूमाईन क्लबपर्यंत मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. ‘टीईटी रद्द करा’, ‘बीएलओची कामे नकोत’, ‘शिक्षकांना शिकवू द्या’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
मोर्चानंतर शिक्षक प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विविध प्रलंबित मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. शिक्षकांना निवडणूक, जनगणना, बीएलओसारखी बिगर शैक्षणिक कामे देण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शासनाने अन्यायकारक बिगर शैक्षणिक कामे तात्काळ रद्द करून शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिक्षकांनी दिला.
या मोर्चात जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. शाळा बंद आंदोलनामुळे अनेक ठिकाणी शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला असला, तरी शिक्षकांनी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवत आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला.
