शिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; हरियाणा-उत्तर प्रदेशातील चार आरोपी अटकेत, एटीएम फसवणुकीचे चार गुन्हे उघड
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहरात एटीएम कार्ड हातचलाखीने बदलून नागरिकांच्या खात्यातील रक्कम लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हरियाणा व उत्तर प्रदेशातील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे एटीएम फसवणुकीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून २०२६ रोजी दुपारी साडेएक ते दोनच्या सुमारास पेंशनर दिपक अमृत चौधरी (वय ६६, रा. पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर) हे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधून एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध आहे का, अशी विचारणा केली. बोलण्यात गुंतवून ठेवत त्यांपैकी एकाने चौधरी यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने बदलले आणि त्याच कार्डच्या माध्यमातून १७ हजार ३०० रुपये काढून फसवणूक केली.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान पोलिसांनी यापूर्वीच्या एटीएम फसवणुकीच्या गुन्ह्यांचा अभ्यास करून आरोपींच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले. घटनास्थळासह शहरातील आणि राष्ट्रीय महामार्गावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यातून एका पांढऱ्या रंगाच्या कारचा संशय आल्याने तिचा मागोवा घेण्यात आला. विविध टोल नाक्यांवरील माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान संबंधित कार चांदवड (जि. नाशिक) येथील एका हॉटेलसमोर उभी असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून हॉटेलमधून बाहेर येताच चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे अलीम रमजान मेव (वय ३२), समुन रमजान मेव (वय ३८), नासिर दिनू मेव (वय २७) (तिघेही रा. पलवल, हरियाणा) तसेच सलमान फजरुद्दीन मेव (वय २८, रा. बुलंदशहर, उत्तर प्रदेश) अशी असल्याचे निष्पन्न झाले.
चौकशीत आरोपींनी एटीएम केंद्रांमध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत एटीएम कार्ड बदलण्याची कबुली दिली. त्यानंतर कार्डचा क्लोन तयार करून खात्यातील रक्कम काढली जात असल्याचेही उघड झाले.
या टोळीच्या ताब्यातून ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तपासात अशाच प्रकारे केलेले चार एटीएम फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांकडून या टोळीच्या इतर गुन्ह्यांचाही तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात रविंद्र अखडमल, अतुल पाटील, सचिन वाघ, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, विनोद अखडमल, भटू साळुंखे, मनोज महाजन, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, प्रशांत पवार आणि अमोल पाटील यांचा समावेश होता.
