मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार; बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या शांततेसाठी सामूहिक प्रार्थना
धरणगाव | प्रतिनिधी (वाल्मिक पाटील)
धरणगाव शहरातील भडंगपुरा परिसरात हजरत भडंगशाह वली रहमतुल्लाह अलैह व काले सय्यद पीर यांच्या पवित्र उर्सनिमित्त आयोजित करण्यात आलेला उर्स व लंगर सोहळा धार्मिक वातावरणात, भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करीम खान यांनी केले. उर्सनिमित्त आयोजित समारंभात मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी इरफान शेख यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ, नगरसेवक विनय भावे, विलास महाजन, लक्ष्मण माळी, परमेश्वर महाजन, तौसिफ पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, हेमंत महाजन, सद्दाम अली, वसीम पिंजारी, सलीम मोमीन यांच्यासह सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी उर्सनिमित्त आयोजित लंगराचा लाभ घेत आयोजकांचे कौतुक केले. उर्स व लंगर सोहळ्याचे नियोजन आणि यशस्वी आयोजन करण्यासाठी संदल कमिटीचे अध्यक्ष निसार अली सय्यद, उपाध्यक्ष नदीम काझी तसेच सज्जाद अली, गुलशेर खान, शोएब खान आणि युनूस खान यांनी विशेष परिश्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी समाजात बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव अधिक दृढ व्हावा तसेच देशात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
