पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते महाशिबिराचे उद्घाटन; प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन
पाळधी बु. | प्रतिनिधी
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पाळधी (बु.) अंतर्गत ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य विभागातर्फे भव्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १३५ नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून उपचारांचा लाभ घेतला.
महाशिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शिबिरातील रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत नियमित औषधोपचार, संतुलित आहार आणि आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले.
या शिबिरात मधुमेह (शुगर), उच्च रक्तदाब (बीपी), क्षयरोग, कुष्ठरोग, सर्दी, खोकला, व्हायरल ताप आदी आजारांची तपासणी करून आवश्यक उपचार व औषधोपचार करण्यात आले.
यावेळी लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, उपसरपंच निसार शेठ, कैलास इंगळे, राहुल धनगर, पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, डॉ. स्वरांजली कदम, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सायमा खान आणि डॉ. रितूल पाटील उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सहाय्यक अनिल महाजन, गटप्रवर्तक संगीता पाटील, आरोग्य सेवक अतुल नन्नावरे, प्रदीप अडकमोल, आरोग्य सेविका चेतना पाटील तसेच सर्व आशा सेविकांनी विशेष परिश्रम घेतले. महाशिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १३५ लाभार्थ्यांनी तपासणी व उपचारांचा लाभ घेतला.
