‘माँ से बेटी सवाई’ उपक्रमांतर्गत संघर्ष, जिद्द आणि यशाचा सन्मान; गावातील पहिली महिला पोलीस ठरली पूजा पाटील
भडगांव | प्रतिनिधी
अत्यंत सामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील लेक असलेल्या कु. पूजा पाटील हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवत यशाचे शिखर गाठले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या वतीने ‘माँ से बेटी सवाई’ या उपक्रमांतर्गत तिचा सन्मान करण्यात आला.
वडगाव टेक येथील रहिवासी असलेली पूजा पाटील ही श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाची विद्यार्थिनी आहे. तिचे आई-वडील रोजंदारीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही पूजाने परिस्थितीसमोर न झुकता सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलात निवड मिळवली. विशेष म्हणजे, ती आपल्या गावातील पहिली महिला पोलीस ठरली आहे.
तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल लिनेस क्लब ऑफ पाचोराच्या अध्यक्षा प्रा. सौ. जयश्रीताई कोमल वाघ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला.
यावेळी श्रीकृष्ण हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अनुजा देशमुख, लिनेस क्लबच्या सचिव सौ. सरलाताई पाटील, ज्येष्ठ संचालिका सौ. उज्वलाजी चोरडिया, सौ. पिंकीजी जुनोदिया, सौ. पूजाजी देसाई आणि कु. चेतना हिरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सन्मान सोहळ्यात उपस्थितांनी पूजा पाटीलच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच समाजातील प्रत्येक मुलीने शिक्षण, आत्मविश्वास, शिस्त आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करून यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
