मीटर तपासणीदरम्यान वादातून वृद्धाचा मृत्यू; महावितरण व ग्रामस्थांच्या फिर्यादींमुळे प्रकरणाला नवे वळण
शहादा | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पिंप्री येथे वीज मीटर तपासणीदरम्यान झालेल्या वादातून ७८ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणी एका बाजूला महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दुसऱ्या बाजूला वीज चोरी, शासकीय कामात अडथळा आणि महावितरणच्या पथकावर हल्ला केल्याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी महावितरण कर्मचाऱ्यांवर गुन्हा
सुरेश उद्धव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १० जुलै रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता महावितरणचे कर्मचारी तुषार दिलीप पाटील, विजय गहाणे आणि पंकज जगन्नाथ कुंभार हे पिंप्री गावात वीज मीटर तपासणीसाठी आले होते.
कैलास पाटील यांच्या घरातील मीटर तपासणी सुरू असताना शेजारी राहणारे नथ्थू लिमजी पाटील (वय ७८) यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. फिर्यादीनुसार, या वादादरम्यान कर्मचाऱ्यांनी नथ्थू पाटील यांना धक्काबुक्की केली. पाठीमागून जोराचा धक्का बसल्याने ते काँक्रीटच्या रस्त्यावर पडले. या पडझडीत त्यांच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या फिर्यादीवरून महावितरणच्या तिन्ही कर्मचाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणची प्रतिफिर्याद; वीज चोरी व पथकावर हल्ल्याचा आरोप
दरम्यान, महावितरणचे कनिष्ठ अभियंता योगेश मधुकर जाधव यांनीही शहादा पोलीस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, पथक वीज चोरीविरोधी मोहिमेसाठी पिंप्री गावात गेले असता कैलास नथ्थू पाटील यांच्या घरातील वीज मीटर बायपास करून वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार नियमानुसार पंचनामा व तपासणी अहवाल तयार करण्यात आला.
याचवेळी नथ्थू पाटील यांनी पथकाशी वाद घातला आणि ते स्वतःहून खाली पडल्याचा दावा महावितरणने केला आहे.
त्यानंतर संतप्त झालेल्या २ ते ३ अज्ञात व्यक्तींनी महावितरणच्या पथकाला घेराव घालत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून काठी तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात सहाय्यक अभियंता विजय कुसुमपुरी गहाणे जखमी झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी अज्ञात तिघांविरुद्ध वीज चोरी, शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दोन्ही बाजूंच्या दाव्यांची चौकशी सुरू
या घटनेत दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे करण्यात आले असून, शहादा पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत असून, तपासानंतर घटनेचे नेमके कारण आणि जबाबदारी स्पष्ट होणार आहे.
