शिरपूर तालुक्यातील रिच्यापाडा येथील घटना; निकृष्ट कामाचा आरोप, ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शिरपूर (धुळे) | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रिच्यापाडा येथे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा नव्याने बांधलेला पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी बांधण्यात आलेला हा पूल कोसळल्याने दोन्ही राज्यांतील नागरिकांचा संपर्क विस्कळीत झाला असून, वाहतुकीसाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुलावरच ठिय्या आंदोलन करत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच नव्याने दर्जेदार पूल उभारण्याची मागणीही करण्यात आली.
स्थानिकांच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि शिरपूर पंचायत समिती बांधकाम विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
पुलाचे बांधकाम सुरू असताना संबंधित अभियंते आणि स्थानिक प्रशासनाने कामाची गुणवत्ता तपासली होती का, कामावर आवश्यक देखरेख ठेवण्यात आली होती का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहेत.
रिच्यापाडा, पळासनेर आणि परिसरातील गावांसह मध्यप्रदेशातील आंबापाणी व इतर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी पूल नसल्यामुळे नागरिकांना ओढ्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. नव्याने पूल उभारल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याने पुन्हा एकदा दोन्ही राज्यांतील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबतही या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाकडून ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना निकृष्ट दर्जाच्या कामांवर नियंत्रण ठेवण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या प्रकरणी मध्यप्रदेशातील आंबापाणी येथील सुरेश यादव, लालसिंग चौहान, तसेच रिच्यापाडा येथील आसिराम पावरा आणि हरसिंग नत्थू पवार यांच्यासह स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने चौकशीची मागणी केली आहे.
