प्रचारक समितीची घोषणा; गावागावात समता, सामाजिक न्याय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करण्याचा निर्धार
जगदीश सपकाळे जळगाव | प्रतिनिधी
समता सैनिक दलाच्या जळगाव (मध्य) जिल्ह्याची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्य संघटक विजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन विस्तार, वैचारिक बांधिलकी, शिस्तबद्ध कार्यपद्धती, प्रशिक्षित कार्यकर्त्यांची निर्मिती तसेच आगामी संघटनात्मक उपक्रमांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, धरणगाव आणि जामनेर तालुक्यांसाठी समता सैनिक दलाच्या मध्य विभाग प्रचारक समितीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली.
प्रचारक समितीत जळगाव शहरातून श्याम उपाध्याय, विनोद आढळे, सुरेंद्र सुरवाडे, बळीराम पाथरवट, राजेंद्र तायडे आणि शोभाताई सपकाळे, जळगाव ग्रामीणमधून एकनाथ सोनवणे, संजय नावकर व प्रदीप नाईक, तर धरणगाव तालुक्यातून दगडू पाथरवट, सुनिता पाथरवट, अनिता नन्नवरे, संगीता शिरसाट आणि रंजना अशोक शिरसाट यांची प्रचारक म्हणून निवड करण्यात आली.
बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गावागावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचे, नवीन सदस्य नोंदणी वाढविण्याचे तसेच युवक, युवती आणि महिलांना संघटनेशी जोडून संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्याध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी वैचारिकदृष्ट्या सक्षम, शिस्तप्रिय आणि समाजनिष्ठ प्रचारकांची फळी उभारणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. राज्य संघटक विजय निकम यांनी मध्य विभागातील प्रत्येक गावात समता सैनिक दलाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रचारक समिती प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीला चाळीसगाव तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव तसेच चाळीसगाव शहर अध्यक्ष विशाल पगारे यांची विशेष उपस्थिती होती. बैठक यशस्वी करण्यासाठी अनिताताई कापुरे, लताताई पाथरवट, संजय सपकाळे, सुधीर सैंदाणे आणि लक्ष्मीबाई मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
बैठकीचा समारोप समता सैनिक दल अधिक सक्षम, शिस्तबद्ध, वैचारिक आणि जनाधारित संघटना म्हणून उभी करण्याचा दृढ संकल्प करून करण्यात आला.
