मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल; तीन आरोपी निष्पन्न
चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई; दोन मोटारसायकलींसह २० हजारांची रोकड हस्तगत
धुळे | प्रतिनिधी
चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या पथकाने मोटारसायकल चोरीच्या दोन गुन्ह्यांची यशस्वी उकल करत तीन आरोपी निष्पन्न केले आहेत. या कारवाईत एकूण १ लाख रुपयांच्या दोन मोटारसायकली आणि २० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ते १८ जुलै २०२६ दरम्यान फिर्यादी आबीद शब्बीर शाह (रा. तिरंगा चौक, म्युनिसिपल कॉलनी, धुळे) यांची ७० हजार रुपये किमतीची मोटारसायकल तसेच डिक्कीतील २० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१५/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच ८ जुलै २०२६ रोजी फिर्यादी हर्षल संजय कावळे (रा. चितोड रोड, धुळे) यांची ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल सत्यम वाईन शॉप रोडवरील मराठा बिर्याणी शॉपसमोरून चोरीला गेल्याने गुन्हा क्रमांक २१७/२०२६ दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उमेर इरफान मन्सुरी (रा. पूर्व हुडको, धुळे) आणि फरदीन शेख लतीफ (रा. गुलशेर नगर, मालेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मोटारसायकल व रोकड चोरीची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेली मोटारसायकल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.
दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ऐंशीफुटी रोड परिसरात पेट्रोलिंग करत असताना एका संशयिताने पोलिसांना पाहताच मोटारसायकल सोडून पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख हमीद रशीद अन्सारी (रा. मौलवीगंज नाल्याजवळ, धुळे) अशी पटली असून तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत तीन आरोपी निष्पन्न करून एक लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि २० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असून मोटारसायकल चोरीचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार तसेच पोलीस अंमलदार अविनाश वाघ, मनोज पाटील, ललिचंद चौधरी, अतिक शेख, शोएब बेग, सचिन पाटील, सिराज खाटीक आणि इंद्रजित वैराज यांनी केली.
अशाप्रकारे मोटर सायकल चोरीचे गुन्हयात 03 आरोपी निष्पन्न करण्यात येवून, चोरीस गेलेल्या एकुण 1,00,000/- रु. किं. च्या 02 मोटार सायकल व 20,000/- रु. रोख हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे चाळीसगावरोड पोलीस ठाणे (1) गु.र.नं. 215/2026 व (2) गु.र.नं. 217 / 2026 BNS क.303 (2) हे मोटार सायकल चोरीचे 02 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजकुमार उपासे यांचे मार्गदर्शनाखाली चाळीसगावरोड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. विवेक पवार आणि पोलीस अंमलदार अविनाश वाघ, मनोज पाटील, ललिचंद चौधरी, अतिक शेख, शोएब बेग, सचिन पाटील, सिराज खाटीक व इंद्रजित वैराज यांनी केली आहे.
