वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेली केळी; विमा कंपनीच्या टाळाटाळीने कासारखेड्यातील शेतकरी अडचणीत
७२ तासांत तक्रार करूनही महिनाभर पंचनामा नाही; भरपाई न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा
कासारखेडा (ता. यावल) | प्रतिनिधी
यावल तालुक्यातील कासारखेडा येथे वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्यानंतरही प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत वेळेत तक्रार करूनही विमा कंपनीकडून पंचनामा करण्यात आलेला नसल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. महिनाभर उलटूनही कोणताही प्रतिनिधी शेतात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कासारखेडा येथील शेतकरी जितेंद्र राजाराम पाटील यांनी केळी लागवडीसाठी बियाणे, खते, सिंचन व्यवस्था आणि मजुरीवर लाखो रुपयांचा खर्च केला होता. केळीचे घड तयार होऊन पीक काढणीच्या टप्प्यावर असतानाच जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नियमानुसार नैसर्गिक आपत्तीची माहिती ७२ तासांच्या आत विमा कंपनीला देणे आवश्यक असते. त्यानुसार शेतकऱ्याने वेळेत ऑनलाईन तसेच टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून तक्रार क्रमांकही प्राप्त केला. मात्र, तक्रार दाखल होऊन महिनाभर उलटल्यानंतरही विमा कंपनीचा कोणताही प्रतिनिधी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शेतात पोहोचलेला नाही.
शेतकऱ्याने वारंवार हेल्पलाइन आणि स्थानिक प्रतिनिधींशी संपर्क साधला असता, “ऑर्डर आलेली नाही”, “लवकरच येऊ”, “सर्व्हर डाऊन आहे” अशा कारणांमुळे वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, विमा कंपन्यांच्या अशा कार्यपद्धतीवर स्थानिक कृषी विभागाकडूनही प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोप परिसरातील शेतकरी करत आहेत.
बाधित शेतकरी जितेंद्र राजाराम पाटील यांनी, “रात्रंदिवस कष्ट करून आणि कर्ज काढून केळीची बाग उभी केली. वाऱ्यामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. विमा भरला म्हणून दिलासा मिळेल असे वाटले होते, मात्र महिनाभर झाला तरी कोणीही पंचनामा करण्यासाठी आलेले नाही. आम्ही न्याय मागायचा तरी कोणाकडे?” अशी व्यथा व्यक्त केली.
दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला नाही आणि योग्य भरपाईची प्रक्रिया सुरू केली नाही, तर यावल तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे.
