जळगाव ग्रामीण मतदारसंघात तीन नवीन रुग्णवाहिकांचे वितरण; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आरोग्यसेवेला बळ
पिंपरी, धरणगाव व जळगाव तालुक्यास प्रत्येकी एक रुग्णवाहिका; आपत्कालीन आरोग्यसेवा अधिक गतिमान होणार
पाळधी | प्रतिनिधी
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपत्कालीन आरोग्य सेवा वेळेत उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पिंपरी, धरणगाव आणि जळगाव तालुक्यासाठी प्रत्येकी एक अशा तीन नवीन रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध होणार असून गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविणे अधिक सुलभ होणार आहे.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “जनतेचे आरोग्य हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही नागरिकाला आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास त्याला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.”
यापूर्वीही जळगाव ग्रामीण मतदारसंघात चार ते पाच रुग्णवाहिका कार्यरत असून, नव्याने तीन रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आरोग्यसेवेचे जाळे अधिक मजबूत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
