केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळ्यात आंबेडकरी संघटनांचा जल्लोष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ फटाक्यांची आतषबाजी; पेढे वाटून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे स्वागत
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर धुळ्यात आंबेडकरी संघटनांच्या वतीने जल्लोष करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले, पेढे वाटले आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाचा आनंद व्यक्त केला.
यावेळी आझाद समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून देशभरातील विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरू केले होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कारवाईविरोधातही देशभरात विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला होता.
विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण संघर्ष, विविध सामाजिक संघटनांचा वाढता दबाव आणि आंदोलनाची तीव्रता यामुळे केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागल्याची भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
धुळ्यातील आंबेडकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी “विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा विजय झाला” अशी भावना व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
