विठ्ठलनामात रमले पालकमंत्री; आषाढी एकादशीला भक्तिभावाने विठ्ठल चरणी नतमस्तक
चिंचपूरा, वाघळूद व विविध विठ्ठल मंदिरांत महाआरती; राज्यातील सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना
पाळधी / धरणगाव / जळगाव | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होत भक्तिभावाने दर्शन घेतले. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुख, समृद्धी व समाधानासाठी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
पहाटेपासून जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये जाऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काकड आरतीत सहभाग घेतला. विठ्ठलाच्या चरणी माथा टेकवत त्यांनी उपस्थित भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील श्री विठ्ठल मंदिरात त्यांनी दर्शन घेत महाआरती केली. यावेळी मंदिर परिसरात “विठ्ठल… विठ्ठल…”च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी त्यांनी मंदिर परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली तसेच भाविकांसाठी उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची वारकरी परंपरेशी असलेली नाळ सार्वजनिक जीवनात नेहमीच अधोरेखित होत आली आहे. संत विचार, कीर्तन, भजन आणि हरिनाम सप्ताह यांसारख्या धार्मिक-सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सहभागी होत असल्याने वारकरी बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आत्मीयता आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी “राज्यात सुख, समृद्धी आणि समाधान नांदो, बळीराजा सुखी राहो आणि वारकरी संप्रदायाची सेवा अखंड सुरू राहो,” अशी भावना व्यक्त केली.
चिंचपूरा व वाघळूद येथे झालेल्या या भक्तिमय कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, सरपंच, लोकप्रतिनिधी, मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
