‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेला वेग; पात्र शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया सुरू
बँकांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्राप्त; बायोमेट्रिक ई-केवायसीनंतर मिळणार कर्जमाफीचा लाभ
हर्षल पाटील जळगाव | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड म्हणून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेच्या अंमलबजावणीला प्रत्यक्ष गती मिळाली असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी ठरली आहे.
बँकांकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची अंतिम यादी संबंधित बँकांना ई-मेलद्वारे पाठविली आहे. या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक ई-केवायसी अनिवार्य
संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी ई-केवायसी बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट/अंगठ्याचा ठसा) पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी पात्र शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रतिनिधीमार्फत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही.
शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे सोबत ठेवावीत
-
आधार कार्ड
-
बँक पासबुक
-
संबंधित बँकेची माहिती
शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेत किंवा जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रात’ जाऊन लाभार्थी यादीत नाव तपासावे आणि विलंब न करता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्याने राज्यातील हजारो पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, बळीराजासाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
