केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळ्यात विजयी तिरंगा रॅली
समविचारी पक्ष व संघटनांचा जल्लोष; ६०० मीटर तिरंगा ध्वजासह शहरातून भव्य रॅली, महापुरुषांना अभिवादन
सुनील निकम धुळे | प्रतिनिधी
दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला यश आल्याचा दावा करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर धुळे शहरात समविचारी पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विजयी तिरंगा रॅली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आग्रा रोड येथून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही रॅली महात्मा गांधी पुतळा परिसरात समारोपास पोहोचली.
रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ६०० मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता. यावेळी महापुरुष तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या प्रतिमा हातात घेऊन सहभागी नागरिकांनी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या विजयी तिरंगा रॅलीत सहभागी झाले.
आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद व्यक्त करत उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे स्वागत केले आणि लोकशाही मार्गाने झालेल्या आंदोलनाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
