शेती विकण्यास व दारूसाठी पैसे देण्यास नकार; संतापलेल्या पतीकडून पत्नीची चाकूने हत्या
भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा हादरला; आरोपी पती ताब्यात, बीएनएस कलम 103(1) अंतर्गत गुन्हा दाखल
भडगाव | प्रतिनिधी (गणेश रावळ)
भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी (दि. 26) सकाळी साडेआठच्या सुमारास कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घडली. शेती विकण्यास तसेच दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम पतीलाल राठोड (वय 40) याने त्याची पत्नी ललिता आत्माराम राठोड (वय 36) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. तसेच शेती विकण्याबाबतही त्याने आग्रह धरला होता. मात्र ललिता राठोड यांनी यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादाच्या भरात संतापलेल्या आत्माराम राठोड याने चाकूने पत्नीच्या पोटावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या ललिता राठोड यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आत्माराम राठोड याला त्वरित ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे संकलित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 240/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत आहेत.
