जळगावात पोलिसांची मोठी कारवाई; ३.५८ लाखांचा ६२ ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्ज जप्त
एलसीबी व एमआयडीसी पोलिसांची संयुक्त धडक; दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा, मालेगावच्या पुरवठादाराचा सहभाग उघड
जळगाव | प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत ६२.०७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केले. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत ३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळ (सेक्टर A-14) समोरील रस्त्यावर एक व्यक्ती अंमली पदार्थांची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ३१ जुलै रोजी रात्री १०.४० वाजता पोलिसांनी सापळा रचून इम्रान खान हयात खान (वय ३६, रा. आव्हाणे, ह.मु. फातेमा नगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत ६२.०७ ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले.
जप्त मुद्देमाल
-
६२.०७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज – किंमत ₹२,८६,०००
-
मोबाईल फोन – किंमत ₹२०,०००
-
हिरो होंडा स्प्लेंडर (MH-17-DL-4598) – किंमत ₹५०,०००
-
एकूण जप्त मुद्देमाल – ₹३,५८,०००
मालेगावच्या पुरवठादाराचा सहभाग उघड
प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जचा पुरवठा रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार इम्रान खान आणि रफीक उर्फ गोल्डन या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यातील तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. अंमली पदार्थांची विक्री किंवा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, जितेंद्र वल्टे, अतुल वंजारी तसेच एलसीबी व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
