पत्रकार संघटनेचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन
भुसावळ | प्रतिनिधी
बोदवड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर पकडण्यासाठी गेलेल्या तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्यावर डंपर अंगावर घालून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याच्या घटनेचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच महसूल अधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनानुसार, अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे ते थोडक्यात बचावले. या प्रकरणात डंपर चालक आकाश सिंग ठाकूर (रा. सालीपुरा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) आणि त्याच्या सहा अज्ञात साथीदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेत नायब तहसीलदार अनिल नाडे, कर्मचारी सचिन पाटील तसेच महसूल सेवक ज्ञानेश्वर सुरडकर यांनाही वाहनाखाली ओढून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
दैनिक जनसम्राटचे संपादक मुकुंद नन्नवरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष संघरत्न सपकाळे, पत्रकार सुरेश पाटोळे, पत्रकार जगदीश सपकाळे आणि पत्रकार वाल्मीक जाधव यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वीही महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या असून त्यांची सरकारी नोंद आहे. त्यामुळे अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्या माफियांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी. तसेच तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व त्यांच्या पथकाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे.
