अतिवृष्टीग्रस्त गावांची मंत्र्यांकडून पाहणी; सरसकट पंचनामे व विशेष मदत पॅकेजची आमदार अमोल पाटील यांची मागणी
देवगाव, तामसवाडी व मुंदाणे गावांना मंत्र्यांची भेट; शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपयांच्या विशेष अनुदानाची मागणी
पारोळा | प्रतिनिधी (संदीप पाटील)
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ३० जुलै रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे शेती, घरे, रस्ते, पूल, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार ॲड. अमोल पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सोमवारी पारोळा तालुक्यातील देवगाव, तामसवाडी आणि मुंदाणे (प्र.उ.) या अतिवृष्टीग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी मंत्र्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेती, घरांची पडझड, वाहून गेलेले रस्ते व सार्वजनिक सुविधांची पाहणी करून प्रशासनाला तातडीने मदतकार्य सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या दौऱ्यात आमदार ॲड. अमोल पाटील यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा मंत्र्यांसमोर मांडत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, अशी ठाम मागणी केली. तसेच शासनाने एरंडोल विधानसभा मतदारसंघासाठी विशेष आर्थिक मदत पॅकेज जाहीर करून शेतकरी, नागरिक आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भरपाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेत सुधारणा करून अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे शेतातील सुपीक माती वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति एकर ५० हजार रुपयांचे विशेष अनुदान देण्यात यावे, अशी महत्त्वपूर्ण मागणीही आमदार पाटील यांनी केली. शेतजमिनीत गाळ किंवा माती भराव करण्यासाठी ही मदत अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार अमोल पाटील यांनी मांडलेल्या मागण्यांची दखल घेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सर्व नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे, मदतकार्याला गती देण्याचे आणि आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. कोणताही शेतकरी किंवा नागरिक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांमध्ये तातडीने मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होईल, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.
