एकाच ठिकाणी दीर्घकाळ कार्यरत पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेरील बदल्यांची मागणी
जळगाव पोलिस अधीक्षकांकडे बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे निवेदन; बदली नियमांचे उल्लंघन व संगनमताचे आरोप, सखोल चौकशीची मागणी
पाचोरा | प्रतिनिधी
जळगाव जिल्हा पोलिस दलात अनेक अधिकारी आणि कर्मचारी प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही एकाच पोलीस ठाण्यात किंवा एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असल्याचा आरोप करत त्यांच्या जिल्ह्याबाहेरील बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे अध्यक्ष हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बदलीचा नियमानुसार कार्यकाळ संपल्यानंतरही काही अधिकारी व कर्मचारी राजकीय हस्तक्षेप, दबावतंत्र किंवा इतर मार्गांचा वापर करून एकाच ठिकाणी सेवा बजावत आहेत. त्यामुळे बदली धोरणाचे उल्लंघन होत असून पोलिस प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
तक्रारीनुसार, काही कर्मचारी व अधिकारी स्वतःच्या तालुक्यात किंवा घरापासून अवघ्या १० ते १५ किलोमीटर अंतरावरील पोलीस ठाण्यांमध्येच वारंवार बदली करून घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेषतः पाचोरा-भडगाव परिसरात अशा प्रकारांची संख्या अधिक असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
याशिवाय, काही कर्मचारी स्थानिक व्यवसाय आणि राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी आपल्या प्रभावाचा वापर करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वरिष्ठ स्तरावर कार्यकाळ वाढीचा कोणताही लेखी आदेश नसतानाही काही कर्मचारी आस्थापना विभागाशी संगनमत करून त्याच नियुक्तीच्या ठिकाणी वेतन घेत असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा नोंदींची सखोल तपासणी करून बदली नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, त्यांची तातडीने मुख्यालयात रवानगी करावी तसेच आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेरील बदल्या कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, निवेदनात करण्यात आलेले आरोप हे तक्रारदारांचे असून, संबंधित आरोपांबाबत पोलिस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
