रोटरी क्लबकडून पाचोरा कन्या विद्यालयाला क्रीडा साहित्य भेट
विद्यार्थिनींनी खेळातून प्राविण्य मिळवावे; पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांचे आवाहन
पाचोरा | प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावच्या वतीने शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक (मिठाबाई) कन्या विद्यालयाला विविध प्रकारचे क्रीडा साहित्य भेट देण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये क्रीडाविषयीची आवड वाढावी आणि त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आयोजित कार्यक्रम ५ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाला रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, प्रशासन सचिव डॉ. स्वप्निल पाटील, प्रोजेक्ट सचिव डॉ. प्रशांत सांगडे, प्रकल्पाचे चेअरमन रो. गिरीश दुसाने, असिस्टंट गव्हर्नर रो. भरत सिनकर, एन्क्लेव्ह सचिव डॉ. मुकेश तेली, ज्येष्ठ रोटेरियन चंद्रकांत लोढाया, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. कुणाल पाटील, निखिल बिडकर, हर्षल चित्ते, पिंकीताई जिनोदिया, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी लगोरी, रबर रिंग, स्किपिंग रोप, बॅडमिंटन रॅकेट, लुडो, फुटबॉल, थाळी, गोळा आणि लेझीम सेट यांसह विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय बॅडमिंटनपटू तथा पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार म्हणाले, “शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात खेळाला विशेष महत्त्व आहे. खेळातून उत्तम आरोग्य, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. प्रत्येक विद्यार्थिनीने आपल्या आवडीच्या खेळात प्राविण्य मिळवून जीवनात यश संपादन करावे.”
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. रवींद्र चव्हाण आणि संगीता बाविस्कर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक अनिल पवार यांनी क्रीडा साहित्य स्वीकारले. प्रा. अंकिता देशमुख यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, नंदू पाटील, सुरेखा बडे, उमेश कडलग, पायल पाटील, शिवाजी बागुल, कोमल चव्हाण, शिवराम पाटील, धनराज धनगर आणि शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.
