जनसामान्य सक्षमीकरणासाठी भुसावळ येथे ‘जनसमाधान बैठक’ संपन्न
जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांशी थेट संवाद; QR कोडद्वारे अर्जांचा ऑनलाइन मागोवा घेण्याची सुविधा
भुसावळ | प्रतिनिधी
नागरिकांच्या दैनंदिन तक्रारी, प्रशासकीय प्रश्न आणि विविध अडीअडचणींचे स्थानिक स्तरावर जलद व कालबद्ध निवारण करण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून उपविभाग स्तरावर राबविण्यात येणारी ‘जनसमाधान बैठक’ भुसावळ येथे उत्साहात पार पडली.
या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधला. विविध विभागांशी संबंधित तक्रारी, मागण्या आणि अर्ज स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
स्थानिक स्तरावरच तक्रारींचे निवारण
या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्यांसाठी जिल्हा मुख्यालयात जाण्याची आवश्यकता राहत नसून, उपविभागीय स्तरावरच प्रशासनाशी थेट संवाद साधून प्रश्न मांडण्याची आणि त्यावर जलद कार्यवाही होण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
डिजिटल पारदर्शकतेवर भर
बैठकीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक अर्जाचे तात्काळ स्कॅनिंग करून ‘जनसमाधान पोर्टल’ वर नोंद करण्यात येत आहे. प्रत्येक अर्जाला स्वतंत्र QR Code देण्यात येत असून, त्याद्वारे नागरिकांना आपल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत निवारण होण्यास चालना मिळत असून, प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
