‘चलो परभणी’चा नारा; व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमतर्फे ९ ऑगस्टला केडर कॅम्प व पदग्रहण सोहळा
पत्रकार हित, संघटनात्मक मजबुती आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
परभणी | प्रतिनिधी – सुरेश जगताप, ठाणे जिल्हा
पत्रकारांच्या हिताचे प्रश्न, संघटनात्मक मजबुती आणि पत्रकारांमध्ये एकजूट निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया – VOM इंटरनॅशनल फोरमच्या वतीने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी परभणी येथे भव्य केडर कॅम्प व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रेणुका मंगल कार्यालय, परभणी येथे होणार असून, यामध्ये पत्रकार हिताशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन व चर्चा करण्यात येणार आहे. तसेच संघटनेच्या कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी संघटनात्मक विषयांवरही मंथन होणार आहे.
या कार्यक्रमादरम्यान नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला असून, संघटनेच्या आगामी वाटचालीबाबतही दिशा निश्चित केली जाणार आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे आवाज उठविणे, पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे आणि संघटनेला अधिक सक्षम करण्यासाठी या केडर कॅम्पला विशेष महत्त्व असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.
