गो. पु. पाटील विद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ
विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटीने प्रयत्न करावेत : प्राचार्य आर. आर. वळखंडे
भडगाव | प्रतिनिधी : गणेश रावळ
तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित गो. पु. पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोळगाव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. वळखंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक बी. डी. साळुंखे, प्रा. एम. ए. पवार, राजमुद्रा फाऊंडेशनचे भूषण सोनवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य आर. आर. वळखंडे यांनी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या एका बोधात्मक कथेचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिला.
जीवनात यशस्वी होण्यासाठी परिस्थितीपेक्षा ध्येय निश्चिती, मेहनत आणि सकारात्मक विचारसरणी अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व, विविध शासकीय सेवांमधील संधी, परीक्षेची तयारी करण्याची पद्धत, अभ्यासाचे नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी मनोगतात कु. कोमल पाटील हिने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम उपक्रम असून, या माध्यमातून भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षांसाठी निश्चितच फायदा होईल, अशी भावना व्यक्त केली.
उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने विद्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेंद्र भोसले यांनी केले. यावेळी विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
