जेल रोडवर हिंदू युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन; दोन दिवसांत अतिक्रमण हटवण्याची मागणी
राजकीय पक्ष व विविध संघटनांच्या अतिक्रमणाला विरोध; कारवाई न झाल्यास रस्त्यावरच पक्के कार्यालय उभारण्याचा इशारा
धुळे | प्रतिनिधी :
धुळे शहरातील जेल रोड परिसरात जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर हिंदू युवा सेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, रस्त्याच्या जागेवर कार्यालय उभारण्यात आल्याने प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना कार्यालय हटविण्याची विनंती केली. त्यावर हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत जेल रोड अतिक्रमणमुक्त करावा, अन्यथा याच ठिकाणी पक्के बांधकाम करून कार्यालय उभारू, असा इशारा मनपा प्रशासनाला दिला.
राजकीय पक्ष, संघटनांच्या अतिक्रमणाला विरोध
पाच कंदील परिसरातील मार्केट जमीनदोस्त केल्यानंतर तेथील व्यापाऱ्यांना पर्यायी जागा म्हणून प्रशासनाच्या वतीने जेल रोड परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, या जागेवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी अतिक्रमण करून कार्यालये थाटल्याचा आरोप हिंदू युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या अतिक्रमणांना विरोध दर्शविण्यासाठी हिंदू युवा सेनेने थेट रस्त्यावर संपर्क कार्यालय उभारल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जेल रोडवरील फळ विक्रेत्यांना वगळता इतर सर्व अतिक्रमणे हटविण्यात यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
‘दोन दिवसांत कारवाई करा’
जेल रोडवरील अतिक्रमणांवर मनपा प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. दोन दिवसांत अतिक्रमण हटविण्यात आले नाही, तर रस्त्यावरच पक्के बांधकाम करून हिंदू युवा सेनेचे कार्यालय उभारण्यात येईल, असा इशारा अमोल सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला.
या भूमिकेमुळे जेल रोडवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आता मनपा प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा हिंदू युवा सेनेचे विकी परदेशी, अमोल सूर्यवंशी, नगरसेवक रोहित चांदोडे, नगरसेवक जयेश वावदे, दिनेश बागुल, मयूर शार्दुल, संतोष परदेशी, मोहन टकले, किरण अहिरे, भटू गवते, टिंकू बडगुजर, कैलास कासार, योगेश कोठावदे, सिद्धार्थ साळवे, सार्थक पाटील, विजय जाधव, प्रितेश अग्रवाल यांच्यासह हिंदू युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
