आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
पाचोरा : प्रतिनिधी : रेणाई सेवा फाउंडेशन संचलित गणराज स्पोर्ट्स अकॅडमी, पाचोरा येथील खेळाडू चि. साहिल सागर बागुल याने तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पाचोरा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. रावेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या जोरावर साहिलची जयपूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
साहिलने स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या या यशामुळे पाचोरा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्राध्यापक सुमित मोरे यांचे मार्गदर्शन
साहिलला या यशासाठी प्राध्यापक सुमित मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. नियमित सराव, मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. आता जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असणार आहे.
पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
साहिल बागुल हा पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील तलाठी सागर रोहिदास बागुल यांचा चिरंजीव आहे. त्याच्या यशामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी आणि पाचोरा तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
स्थानिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारणाऱ्या साहिलकडून आगामी स्पर्धेतही पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याच्या या यशामुळे परिसरातील नवोदित खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळणार आहे. साहिल बागुलच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत असून, जयपूर येथील आगामी स्पर्धेसाठी त्याला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
