यावलमध्ये पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या; २० वर्षीय विवाहितेचा मृत्यू, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात!
आयेशानगरातील तिरुपतीनगर परिसरात धक्कादायक घटना; कौटुंबिक वादातून हत्या केल्याचा प्राथमिक संशय, साकळी गावाजवळ पोलिसांनी घेतले ताब्यात
यावल | अक्षय वाघ
यावल शहरातील आयेशानगर परिसरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. मशीराबी फरदीन खान (वय २०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित पती फरदीन खान आरिफ खान (वय २१) याला यावल पोलिसांनी साकळी गावाजवळ ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे यावल शहरात खळबळ उडाली आहे.
कौटुंबिक वादातून घडली घटना
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यावल शहरातील भुसावळ रस्त्यालगतच्या विस्तारित आयेशानगर परिसरातील तिरुपतीनगर येथे शेख साबीर शेख आमिन यांच्या घर क्रमांक ५७० मध्ये आरिफ खान गनी खान हे भाडेकरू म्हणून राहतात. त्यांचा मोठा मुलगा फरदीन खान याचे गेल्याच वर्षी मशीराबी हिच्याशी लग्न झाले होते.
सोमवारी पती-पत्नी दोघेही घरी असताना त्यांच्यात दुपारच्या सुमारास वाद झाला. कुटुंबातील इतर सदस्य लग्नसमारंभासाठी गावात गेले होते. याचदरम्यान झालेल्या वादातून फरदीन याने पत्नीच्या छातीवर बसून तिचा गळा दाबल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर तो तेथून पसार झाला.
सायंकाळी प्रकार उघडकीस; पोलिसांची घटनास्थळी धाव
सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद, हवालदार वासुदेव मराठे, वसीम तडवी, एजाज गवळी, अर्षद गवळी आणि अलाउद्दीन तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या फरदीन खान याला पोलिसांनी साकळी गावाजवळ ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
मृतदेह ग्रामीण रुग्णालयात; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह रात्री यावल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
यावल पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला आहे. शहरातील पोलीस ठाण्यापासून अवघ्या एक-दोन किलोमीटर अंतरावर ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना तातडीने मिळाली का, तसेच स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर वरिष्ठांकडून पुरेसे लक्ष दिले जात आहे का, असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. यावल तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबींची दखल घ्यावी, अशी मागणीही होत आहे.
