आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील महामोर्चासाठी नांदगावात आज तातडीची बैठक!
५९ अनुसूचित जाती समूहांच्या एकजुटीचा एल्गार; ४ नोव्हेंबरच्या मनमाड महामोर्चाला राज्यभरातून वाढता प्रतिसाद
नांदगाव | प्रतिनिधी | दीपक अंभोरे
महाराष्ट्र सरकारच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात बुधवार, दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी मनमाड येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पूर्वतयारीला आता वेग आला असून, राज्यभरातून वाढता प्रतिसाद मिळत असल्याचा दावा आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने केला आहे. हा महामोर्चा ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपाचा होईल, असा विश्वासही समितीने व्यक्त केला आहे.
महामोर्चाच्या नियोजनाला अंतिम रूप देण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी आणि जास्तीत जास्त अनुुसूचित जाती बांधवांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने रविवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता नांदगाव येथील सारनाथ बुद्ध विहारात तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला नांदगाव तालुक्यातील विविध अनुसूचित जाती समूहांचे बांधव आणि आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती, अशी माहिती आयोजकांनी दिली.
प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब
४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामोर्चासाठी प्रमुख पाहुणे आणि वक्त्यांची नावे नियोजन बैठकीतच निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
महामोर्चासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुढील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१. आनंदराज आंबेडकर
२. बबनराव घोलप (चर्मकार समाज)
३. माणिकराव भंडगे (होलार समाज)
४. रमेश निकम
५. सचिन लोंढे (मांग गारुडी समाज)
६. अर्जुन नाना पगारे
७. राजू थाटे
८. रुख्मिणीताई लोंढे
९. न्यायाधीश अनिल वैद्य
५९ अनुसूचित जाती समूहांच्या हक्कांसाठी एकजुटीचे आवाहन
हे आंदोलन कोणत्याही एका राजकीय पक्षाचे नसून, ५९ अनुसूचित जाती समूहांच्या हक्कांचे, सामाजिक एकजुटीचे आणि संविधानाच्या संरक्षणाचे आंदोलन असल्याचे कृती समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व अनुसूचित जाती बांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने या एल्गार महामोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“एकजूट होऊया… एल्गार महामोर्चा यशस्वी करूया!” या निर्धाराने नांदगाव तालुक्यात महामोर्चाच्या तयारीला वेग आला आहे.
जय भीम! जय संविधान!
