“पोटाला चिमटा काढून फी भरली, आता आत्महत्याच करायची का?”; SITS नऱ्हेच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांचा DTE वर धडक मोर्चा!
दोन महिने उलटूनही लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स ठप्प; प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयात वर्ग करण्यासह फी परताव्याची मागणी, आश्वासन न पाळल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा
पुणे | प्रतिनिधी
‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, या आशेने शेतकरी, कष्टकरी आणि नोकरदार पालकांनी जमिनी विकून, कर्ज काढून आणि पोटाला चिमटा लावून लाखो रुपयांची फी भरली. मात्र, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (SITS), नऱ्हे कॅम्पसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर दोन महिने उलटूनही लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स सुरू नसल्याचा आरोप करत संतप्त पालक आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयावर (DTE) धडक मोर्चा काढला. ‘एसआयटीएस नऱ्हे पालक संघर्ष समिती’च्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात सीईटी सेल, उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
दोन महिने शिक्षण ठप्प; पालकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष?
समितीच्या म्हणण्यानुसार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी संस्थेचे संस्थापक मारुती नवले यांना पहिले लेखी निवेदन देऊन महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज आणि प्रॅक्टिकल्स सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, कॅम्पस आणि हॉस्टेलची परिस्थिती पूर्ववत झाली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
त्यानंतर २२ ऑक्टोबर रोजी समितीच्या प्रतिनिधींनी नवले यांची पुन्हा प्रत्यक्ष भेट घेऊन विद्यार्थ्यांची अडचण मांडली. संस्थेला काही अडचणी असून पुढील काही दिवसांत सर्व सुरळीत होईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे समितीने सांगितले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झाली नसल्याने पालकांचा संताप वाढला.

विद्यापीठाची २४ तासांत शोकॉज नोटीस
या प्रकरणी पालक संघर्ष समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यापीठाने २४ तासांच्या आत संस्थेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती समितीने दिली.
दुसरीकडे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही पालक समितीला भेट मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात असताना सरकारमधील जबाबदार मंत्र्यांनी पालकांचे म्हणणे ऐकून घ्यायला नको का, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
हॉस्टेल बंद; शिक्षणासोबत आर्थिक भुर्दंडही
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्थेचे अधिकृत हॉस्टेल बंद असल्याने विद्यार्थ्यांना बाहेर खासगी खोल्या, हॉस्टेल आणि मेसची व्यवस्था करावी लागत आहे. त्यामुळे आधीच शैक्षणिक फीचा मोठा भार उचललेल्या पालकांवर अतिरिक्त आर्थिक खर्चाचा बोजा पडत आहे. लाखो रुपये खर्च करूनही विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण मिळत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली.
समितीचे प्रतिनिधी प्रशांत कांबळे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “नोकरदार, शेतकरी आणि कष्टकरी पालकांनी रक्ताचे पाणी करून, प्रसंगी शेतजमिनी विकून आणि अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज काढून मुलांची फी भरली आहे. हॉस्टेल बंद असल्याने अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. एवढा पैसा खर्च करूनही दोन महिने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसेल, तर त्यांनी न्याय कोणाकडे मागायचा? या परिस्थितीमुळे एखाद्या हताश पालकाने किंवा विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्यास त्याची जबाबदारी सरकार, उच्च शिक्षण विभाग आणि सीईटी सेलने स्वीकारली पाहिजे.”
पालक संघर्ष समितीच्या प्रमुख मागण्या
आंदोलनानंतर पालक संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डॉ. सुरेश आ. पाटील यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन देण्यात आले. त्यामध्ये पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
-
प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयात वर्ग करा: SITS नऱ्हे कॅम्पसमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांना सक्षम शासकीय किंवा मान्यताप्राप्त अन्य महाविद्यालयांमध्ये वर्ग करण्यात यावेत.
-
पालकांशी चर्चा करूनच महाविद्यालय निश्चित करा: विद्यार्थ्यांना दुसऱ्या संस्थेत प्रवेश देण्यापूर्वी सरकार आणि शिक्षणमंत्र्यांनी पालकांशी प्रत्यक्ष चर्चा करावी. विद्यार्थ्यांच्या घराजवळील आणि त्यांच्या सोयीचे महाविद्यालय विचारात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय द्यावा.
-
तोपर्यंत नियमित शिक्षण सुरू ठेवा: अधिकृत स्थलांतराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दररोजचे लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्स ऑफलाइन पद्धतीने पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावेत.
-
शैक्षणिक व हॉस्टेल फी परत करा: पालकांकडून घेतलेली शैक्षणिक आणि हॉस्टेल फी व्याजासह परत करण्यात यावी.
अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन; पालकांचा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
निवेदन स्वीकारताना सहसंचालक स्मिता गाडे यांनी विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ दिले जाणार नाही, तसेच पालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती शासकीय पावले तातडीने उचलली जातील, असे लेखी आश्वासन दिल्याचे समितीने सांगितले.
मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट करत पालक संघर्ष समितीने प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. दिलेल्या आश्वासनांची वेळेत पूर्तता झाली नाही, तर मंत्रालयासमोर आणि तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा निर्धार पालकांनी व्यक्त केला.
पालक आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
या आंदोलनात समितीचे सदस्य नामदेव तौर, राजेंद्र बल्लाळ, किशोर मोहिते, सुनील बोरगे, रमेश गायकवाड, अंजली ठोंबरे, रेणुका यादव, संजय गाडेकर, वैभव जावहिरे, शिवाजी ठोबरे, संपतराव घोरपडे, नारायण खळकर, संतोष पवार, शंकरराव होणराव आणि राजेंद्र काळे यांच्यासह अनेक पालक सहभागी झाले होते.
विद्यार्थिनी तनया कांबळे, कृपा जावहिरे, अदिती गायकवाड, तन्मयी बल्लाळ, तेजस्विनी बोरघे तसेच अवधूत यादव, संस्कार खालडकर, विनायक मोहिते, अथर्व बोडके, सक्षम गायकवाड, शिवम होनराव यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग नोंदविला.
पालकांनी आयुष्याची पुंजी खर्च करून मुलांच्या शिक्षणासाठी घेतलेले कष्ट आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांऐवजी प्रत्यक्ष निर्णय आणि तातडीची अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी या आंदोलनातून जोर धरत आहे.
