पाचोऱ्याच्या साहिल बागुलची सुवर्णभरारी; जयपूर येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!
आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; ऑल इंडिया आंतरविद्यापीठ स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी
पाचोरा, प्रतिनिधी : रेणाई सेवा फाउंडेशन संचलित गणराज स्पोर्ट्स अकॅडमी, पाचोरा येथील युवा खेळाडू चि. साहिल सागर बागुल याने तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत पाचोरा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढविला आहे. रावेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन व आंतरविभागीय तायक्वांदो स्पर्धेत त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या जोरावर साहिलची जयपूर येथे होणाऱ्या ऑल इंडिया आंतरविद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
स्पर्धेदरम्यान साहिलने उत्कृष्ट कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याने सुवर्णपदकाला गवसणी घातली असून, आता त्याला राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. जयपूर येथे होणाऱ्या आगामी स्पर्धेत तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने पाचोरा तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. सुमित मोरे यांचे मार्गदर्शन
साहिलच्या या यशामागे नियमित सराव, कठोर मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याला प्राध्यापक सुमित मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर साहिलने मिळविलेले हे यश इतर नवोदित खेळाडूंसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
साहिल बागुल हा पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील तलाठी सागर रोहिदास बागुल यांचा चिरंजीव आहे. त्याने मिळविलेल्या सुवर्णयशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, क्रीडाप्रेमी आणि परिसरातील नागरिकांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
स्थानिक स्तरावरून विद्यापीठीय स्पर्धेत यश मिळवत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड होणे ही साहिलच्या क्रीडा प्रवासातील महत्त्वाची कामगिरी आहे. जयपूर येथील स्पर्धेतही त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून पदक मिळवावे, अशा शुभेच्छा त्याला दिल्या जात आहेत.
