जनावरे चोरणारी टोळी नरडाणा पोलिसांच्या जाळ्यात!
बैलजोडी चोरीचा गुन्हा उघड; वाहनासह ३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांना अटक
नरडाणा | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा नरडाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील शेतकऱ्याच्या शेडमधून चोरीला गेलेल्या बैलजोडीचा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत वाहनासह एकूण ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सिंदखेडा तालुक्यातील दोघांसह अमळनेर येथील एक अशा तिघांना अटक करण्यात आली आहे.
वारूड येथील शेतकऱ्याची बैलजोडी चोरीला
शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथील शेतकरी मुकेश पाटील यांच्या जनावरांच्या शेडमधून बैलजोडी चोरीला गेली होती. याप्रकरणी नरडाणा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता बैलजोडी चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
जामनेर येथे बैलजोडी विकल्याची कबुली
या प्रकरणात पोलिसांनी पुढील संशयितांना अटक केली आहे.
-
रुपेश भरत पाटील (वय २७) – रा. होळ, ता. शिंदखेडा
-
मनीष रमेश पाटील (वय ४६) – रा. वारूड, ता. शिंदखेडा
-
महेंद्र दादाभाऊ भोई (वय ३८) – रा. अमळनेर
आरोपींनी चोरी केलेली बैलजोडी जामनेर येथे विकल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत वाहनासह ३ लाख ३५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली.
बैलजोडी चोरीचा गुन्हा उघड झाल्याने परिसरातील पशुपालक व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याकडे लक्ष लागले आहे.
