मुंबई-आग्रा महामार्गावर सिनेस्टाईल दरोडा; सुरतच्या कुरिअर कंपनीच्या कारमधून ३ कोटी ६ लाखांची रोकड लंपास!
पळासनेरजवळ दोन वाहनांतून आलेल्या पाच ते सहा दरोडेखोरांचा धुमाकूळ; कर्मचाऱ्यांना मारहाण करून अपहरण, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांची घटनास्थळी भेट
शिरपूर, धुळे | प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाजवळ मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी सिनेस्टाईल थरार घडवून आणला. सुरत येथील कुरिअर कंपनीच्या कारला दोन वाहनांनी अडवून पाच ते सहा दरोडेखोरांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करून तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड असलेल्या बॅगा आणि मोबाईल फोन लुटून दरोडेखोर पसार झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. दरम्यान, शिरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दोन वाहनांतून आलेल्या दरोडेखोरांनी कार अडवली
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील ‘पी. उमेशचंद्र अँड सन्स एलएलपी’ या कुरिअर कंपनीचे कर्मचारी सुनील शिवराम पटेल आणि त्यांचे सहकारी शैलेश पटेल हे कंपनीची मोठी रोकड घेऊन प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची कार पळासनेर गावाजवळ आली असता, इनोव्हा कारने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करून रस्ता अडवला.
यावेळी इनोव्हा आणि आर्टिगा या दोन वाहनांतून आलेल्या पाच ते सहा जणांनी तोंडाला रुमाल बांधले होते. त्यांनी लोखंडी पाइपने कुरिअर कंपनीच्या कारची काच फोडली आणि आतील दोन्ही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बाहेर काढले.
कर्मचाऱ्यांना मारहाण करून अपहरण
दरोडेखोरांनी सुनील पटेल आणि शैलेश पटेल यांना मारहाण करून इनोव्हा कारमध्ये डांबले. त्यानंतर त्यांना अन्यत्र नेऊन त्यांच्याकडील ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड असलेल्या बॅगा आणि दोघांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. लुटीनंतर दरोडेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
विशेष पोलीस महानिरीक्षकांची घटनास्थळी भेट
इतक्या मोठ्या रकमेच्या दरोड्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
महामार्गावर घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे वाहनचालक आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या रकमेची रोकड लुटणाऱ्या टोळीचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
