पिंपरी-चिंचवड : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीमध्ये नवीन जनरेटर बसवूनही तो सुरू करण्यात आलेला नसल्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. त्यामुळे दुःखद प्रसंगीही नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे १५ दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने अमरधाम स्मशानभूमीत नवीन जनरेटर बसवला आहे. मात्र, अद्याप तो कार्यान्वित करण्यात आलेला नाही. परिणामी, वीजपुरवठा खंडित झाल्यास अंत्यविधी प्रक्रिया थांबते आणि नागरिकांना एक ते दीड तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

सध्या येथे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येत असले तरी, वीज नसल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने अडचणी वाढत आहेत. विशेषतः आठवड्यातून एक ते दोन वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे अंत्यविधी प्रक्रिया लांबणीवर पडते. यामुळे मृतांच्या नातेवाईकांना अधिक वेळ थांबावे लागत असून त्यांचा मानसिक त्रास वाढत आहे. यापूर्वी वापरात असलेला जुना जनरेटर खराब झाल्यामुळे नवीन जनरेटर बसवण्यात आला. मात्र, तो अद्याप सुरू न केल्याने त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याची टीका होत आहे. या निष्काळजीपणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “नवीन जनरेटर त्वरित सुरू करून अंत्यविधी प्रक्रियेत होणारा विलंब थांबवावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अमरधाम स्मशानभूमी ही शहरातील महत्त्वाची सुविधा असून, अशा ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव असणे ही गंभीर बाब मानली जात आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देत नवीन जनरेटर कार्यान्वित करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
