शिवतीर्थ मैदानावरून उद्या होणार सुरुवात; सर्व समाजातील हिंदू बांधवांना सहभागाचे आवाहन
कोल्हापूरची युद्धकला अन् ढोल-ताशांचा दणदणाट;
जळगाव : हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात शनिवारी (९ मे) भव्य शोभायात्रा आणि सामूहिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती सार्वजनिक उत्सव समिती, जळगाव यांच्या वतीने आयोजित या शोभायात्रेला संध्याकाळी ६ वाजेपासून प्रारंभ होणार आहे.
शहरातील शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड) येथून या भव्य मिरवणुकीची सुरुवात होणार असून जळगाव शहरासह परिसरातील सर्व समाजातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.
पारंपरिक वेशभूषेत सहभागाचे आवाहन
समितीच्या वतीने यंदाचा उत्सव “भव्य आणि दिव्य” स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. पुरुषांनी पारंपरिक पोशाखात सहभागी व्हावे, तर महिलांनी लाल किंवा पिवळ्या रंगाची साडी नेसून मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विविध संघटना, संस्था, मंडळे आणि शाखांनी आपल्या परिसरातून महाराणांची स्वतंत्र शोभायात्रा काढून कोर्टाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एकत्र जमायचे आहे. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून सर्वसमावेशक भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
कोल्हापूरच्या युद्धकलेचे खास आकर्षण
या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोल्हापूर येथील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या आखाड्याकडून सादर करण्यात येणारी रोमांचक युद्धकला प्रात्यक्षिके. तलवारबाजी, दांडपट्टा आणि पारंपरिक युद्धकलेच्या थरारक सादरीकरणामुळे नागरिकांना शिवकालीन पराक्रमाची अनुभूती मिळणार आहे.
याशिवाय ढोल-ताशा पथकांचा गजर, मंगल वाद्य, आकर्षक लाईटिंग, भगवे झेंडे आणि सजवलेल्या बग्ग्यांमुळे संपूर्ण शहर भगवेमय होणार आहे.
शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक
ही शोभायात्रा स्टेट बँक, बस स्टँड, स्वातंत्र्य चौक मार्गे पुढे जात हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह स्मारका जवळ पोहोचणार आहे. तेथे महाराणांच्या प्रतिमेचे पूजन तसेच सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीने सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा तसेच हा संदेश विविध संस्था, मंडळे आणि समाजबांधवांपर्यंत मोठ्या प्रमाणावर पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
