शेतकरी, सर्पमित्र आणि प्राणीमित्रांच्या तत्परतेमुळे दोन काळवीटांची सुखरूप सुटका
पाळधी, ता. जामनेर : चेतन रोकडे
पाळधी परिसरातील शेतशिवारात ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये शिंगे अडकून तडफडणाऱ्या दोन काळवीट हरणांना शेतकरी, सर्पमित्र आणि प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.
माळप्रिंपी रस्त्यालगत अमजद अब्बास पठाण यांच्या शेतामध्ये दोन काळवीट हरणांची शिंगे ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये अडकली होती. शिंगे घट्ट अडकल्याने दोन्ही हरणे बराच वेळ तडफडत होती आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी धडपड करत होती. ही बाब शेजारील शेतकरी निळकंठ शिवदास माळी यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सर्पमित्र तथा प्राणीमित्र नाना माळी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
अथक प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका
माहिती मिळताच नाना माळी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांतपणे हाताळली. त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक ठिबक सिंचनाच्या नळ्या कापून हरणांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही काळवीटांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. सुटका होताच दोन्ही हरणांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
वनविभागालाही माहिती
या घटनेची माहिती अशोक ठोंबरे यांनाही देण्यात आली. वेळेवर मदत आणि माणुसकीची भावना जपत शेतकरी, सर्पमित्र आणि प्राणीमित्रांनी मुक्या जीवांना दिलेले हे जीवदान परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. वन्यजीव संरक्षणासाठी नागरिकांनी दाखविलेली संवेदनशीलता आणि तत्परता समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
